मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे देशातील अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. या लोकांच्या समस्यांचे निराकरण केले नाही तर कदाचित देशातील जनता पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागेल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. 'सामना'तील रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी कोरोना काळातील केंद्र सरकार आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. यासाठी संजय राऊत यांनी इस्रायलचा दाखला दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू हे नरेंद्र मोदींचे मित्र आहेत. आर्थिक डबघाई आणि कोरोनासंदर्भातील अपयश यामुळे संतापलेल्या इस्रायली जनतेने जागोजागी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरु केली आहेत. इस्रायलची जनता पंतप्रधान नेत्यानाहूंचा राजीनामा मागत आहे. ही वेळ हिंदुस्थानवरही येऊ शकते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सोनियांच्या नावाने शपथ घेणारे आणीबाणीतल्या आंदोलकांना पेन्शन कशी देणार?', भाजपची टीका

या कोरोना 'मंदी'मुळे देशातील १० कोटी लोक रोजगार गमावणार आहेत. हा वरवरचा आकडा आहे.  किमान ४० कोटी कुटुंबांच्या उपजीविकेवर आक्रमण होईल. लोकांच्या संयमालाही मर्यादा आहेत. नुसत्या आशेवर आणि आश्वासनांवर लोकांनी कुठवर दम काढायचा?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

या लेखात संजय राऊत यांनी कोरोनाच्या काळात राम मंदिराचे भूमिपूजन आणि राफेल विमानांसंदर्भातील बातम्यांना अवास्तव महत्त्व दिले जात असल्याचे म्हटले आहे. बातम्यांचे महत्त्व असे की, संकटावर कुणी बोलत नाही. भूक, बेरोजगारी कुणी तळमळ व्यक्त करताना दिसत नाही. संकट हीच संधी अशी वाक्ये तोंडावर फेकणे सोपे असते. पण लोक संकटांशी मुकाबला कसा करीत आहेत, हे कुणालाच माहीत नाही. पंतप्रधान मोदींच्या २० लाख कोटींच्या आत्मनिर्भर पॅकेजचे शिंतोडे त्यांच्यावर उडाले आहेत काय, हा सवाल सरकारने स्वत:ला विचारला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.