Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक सरकारनं (Karnataka Government) नवी कुरापत केलीय. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर (Sangli, Jath) कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी म्हटलंय. त्यासाठी बोम्मई यांनी जत तालुक्यातल्या ग्रामपंचायतींच्या जुन्या ठरावांचा संदर्भ दिलाय. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. त्याठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई असते. त्यामुळे पाण्याच्या मागणीवरून 2012 मध्ये काही ग्रामपंचयातींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला होता. त्याचा धागा पकडून कर्नाटक सरकार जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकचे मुख्यमंत्री काय म्हणाले?
सांगलीतल्या जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई होती. या तालुक्याला पाणी देऊन आम्ही पाणी प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला असा दावा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचयातींनी कर्नाटकात सामील होऊ इच्छितो असा ठराव केला होता, त्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, राज्याराज्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करु नये, असा इशाराही बोम्मई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिला आहे. 


देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या दाव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही,  उलट सीमाभागातील गावं आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. जतमधील गावांचा ठराव 2012 सालचा आहे, नव्याने कोणताही ठराव झालेला नाही असं सांगत फडणवीस यांनी 'म्हैसाळ योजना तातडीनं लागू करणार असल्याचं सांगितलं.


विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
यासंदर्भात आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. राज्यातलं सरकार तातडीने घालवलं नाही तर केंद्र सरकार राज्याचे पाच तुकडे करेल असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. जत तालुक्यावर कर्नाटकने दावा केल्यानंतर आता राऊतांनी हा आरोप केलाय. तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचा निषेध करत अन्याय सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिलीय.