मुंबई : शिवसेना - नारायण राणे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली. यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. याला प्रत्युत्तर देणार ट्विट नितेश राणेंनी केलंय. मुंबईत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा होण्याची दाट शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट केले आहे.


नितेश राणेंनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे आता मुंबईत शिवसैनिक आणि राणे समर्थक एकमेकांना भिडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.



नारायण राणेंना अटक होणार का? राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे. राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. आज चिपळूणमध्ये त्यांच्या यात्रेला सुरुवात होईल. तिथेच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणेंना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.


नारायण राणेंविरोधात पोस्टरबाजी 


तसेच मुंबईतही नारायण राणेंविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली. शिवसेनेने दादर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात 'कोंबडी चोर' असे पोस्टर लावण्यात आले. मात्र अवघ्या एक तासात मुंबई पोलिसांनी हे पोस्टर हटवले आहेत. असं असलं तरीही या पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.