`महाविकासआघाडी`त पुन्हा नाराजी, काँग्रेस मंत्र्याने केलेल्या नियुक्त्यांना शिवसेना-राष्ट्रवादीचा विरोध
महाविकासआघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे.
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : महाविकासआघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य समोर आलं आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय नियुक्त्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. या नियुक्त्या करताना नितीन राऊत यांनी काँग्रेस नेत्यांशीही चर्चा केली नसल्याचं समोर आलं आहे.
महामंडळांचं वाटप प्रलंबित असताना उर्जा खात्याशी संबंधित पारेषण, निर्मिती या कंपन्यांच्या संचालक मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली. नितीन राऊत यांनी महाविकासआघाडीमधल्या कोणत्याही पक्षाशी चर्चा न करता या नियुक्त्या केल्याची माहिती आहे. उर्जा खात्याचं राज्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असताना राऊत यांनी राज्यमंत्र्यांनाही याची कल्पना दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
परस्पर करण्यात आलेल्या या नियुक्त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विरोध केला आहे. घटक पक्षांशी विचारविनिमय न करता नेमणुका केल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. या नेमणुका रद्द करण्याची मागणी केली जात आहे.
याआधी मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन महाविकासआघाडीत नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं. गृहखात्याने मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या काही दिवसांमध्ये रद्द केल्या. यानंतर शरद पवार गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेऊन मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. तसंच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनाही मातोश्रीवर जावं लागलं. या सगळ्या वादानंतर अखेर काही पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा बदली झालेल्या ठिकाणी पाठवण्यात आलं.