मुंबई : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनं कोणतीही किंमत मोजण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी शिवसेनेनं पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचं कळतं आहे. काँग्रेस आणि पवारांना मान्य असेल तर अजित पवारांचं मनवळवण्यासाठी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी शिवसेनेनं दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत बंद दाराआड ही चर्चा झाल्याचं समजतं आहे. पवारांच्या या प्रस्तावावरील भूमिकेबाबत माहिती मिळू शकलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे अजित पवारांना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद द्यायला शिवसेना तयार असल्याची चर्चा रंगत असताना शरद पवारांनीही मुख्यमंत्रिपदाची मागणी राष्ट्रवादीची होती असं स्पष्ट केलं मात्र त्यात एकवाक्यता झाली नाही असं म्हटलं. तर ही ऑफर आम्ही दिलेली नाही तर फडणवीसांनी अजित पवारांना दिली असेल असं राऊत यांचं म्हणणं आहे.


सरकार स्थापन होण्याच्या मार्गावर असताना अजित पवारांनी अचानक भाजपला समर्थन देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे सगळेच पक्ष हैराण झाले. ही गोष्ट शिवसेनेच्या अधिक जिवारी लागली आहे. शिवसेना आणि भाजप मुख्यमंत्रिपदाबाबत ठाम असल्याने युती तुटली आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हे जवळपास निश्चित असतानाच भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का दिला. त्यामुळे आता शिवसेना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी देखील तयार असल्याची चर्चा आहे.


दुसरीकडे अजित पवारांची समजूत काढण्याचा शेवटचा प्रयत्न करणार असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ५४ आमदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न आहे. पण तसं नाही झालं तर पक्ष पुढची कारवाई करेल. असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.