कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शिवसेनेचे आजपासून ढोलवादन
शेतक-यांना कर्जमाफी जाहीर झालेली असली तरी अंमलबजावणीवरून शिवसेनेनं भाजपला घेरण्याची तयारी सुरू केलीय. शेतकरी कर्जमुक्तीच्या वसुलीसाठी राज्यातल्या जिल्हा बँकांसमोर आजपासून ढोल वाजवून आंदोलन करण्यात येणार आहे.
मुंबई : शेतक-यांना कर्जमाफी जाहीर झालेली असली तरी अंमलबजावणीवरून शिवसेनेनं भाजपला घेरण्याची तयारी सुरू केलीय. शेतकरी कर्जमुक्तीच्या वसुलीसाठी राज्यातल्या जिल्हा बँकांसमोर आजपासून ढोल वाजवून आंदोलन करण्यात येणार आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी शिवसेना पदाधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत अधिवेशनातल्या रणनितीवर चर्चा करण्यात आली. त्याचाच भाग म्हणून कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला होता.
राज्य सरकारने ३४ लाख शेतकर्यांची कर्जमुक्ती केलीय. प्रत्यक्षात मात्र शेतक-यांच्या हातात पैसैच आलेले नाहीत. त्यामुळे शेतक-यांच्या कर्जवसुलीसाठी बँकेचे अधीकारी जसे दारात येतात. त्याचप्रमाणे आता शेतक-यांच्या कर्जमुक्तीच्या वसुलीसाठी बँकेच्या दारात शिवसेना ढोल वाजवणार आहे.
शिवसेना त्या जिल्ह्यातील कर्जमुक्त शेतकर्यांची यादी नोटीस बोर्डवर लावणार. आणि त्यांना तात्काळ पैसै देऊन कर्जमुक्तं करण्यासाठी बँकेच्या दारातच ढोल वाजवून आंदोलन करणार आहे.