मुंबई : शिवसेनेकडून विद्यमान आमदारांना डावलून वांद्रे पूर्व मतदारसंघातून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळेतर विद्यमान आमदार तृप्ती सावंत प्रचंड नाराज झाल्या होत्या. त्यांनी मातोश्रीवर ठिय्या मांडला होता. मात्र, त्याचा पक्षश्रेष्ठींवर काहीही परिणाम झाला आहे. त्यानंतर त्यांनी थेट अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी मारली आहे. त्यामुळे वांद्र पूर्व येथून सेनेत बंडखोरी पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तसेच भांडुपमधील विद्यमान आमदार अशोक पाटील यांनाही डावलण्यात आले. त्यांच्याऐवजी रमेश कोरगांवकर यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे तृप्ती सावंत आणि अशोक पाटील यांच्या समर्थकांनी मातोश्रीबाहेर ठिय्या मांडला होता. अशोक पाटील यांचे तिकिट कापण्यामागचे कारण काय हे सांगण्यात आले नाही. विद्यामान आमदार तृप्ती सावंत यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत शिवसेना उमेदवाराविरोधात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत राहिल्याने शिवसेना ही बंडखोरी कशी रोखणार याचीच चर्चा सुरु झाली आहे. 


दरम्यान, मातोश्रीकडून नाराज आमदार तृप्ती सावंत यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्नही केला नाही. त्यामुळे त्यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी होण्याची शक्यता आहे.