`या तेजस्वी चेहऱ्यानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल`
वाचा अग्रलेखात म्हटलंय तरी काय....
मुंबई : पंतप्रधान Narendra Modi नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशाला संबोधित केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण देशाला संबोधित करणार असल्याची माहिती दिल्या क्षणापासून भाषण सुरू होईपर्यंत, मोदी नेमकं काय बोलणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. अनेकांनी या भाषणाचे मुख्य मुद्दे काय असतील याबाबत अंदाजही वर्तवला.
अखेर तो क्षण आला, ते आले ते बोलले... आणि अवघ्या काही मिनिटांत त्यांनी हे संबोधनपर भाषण आवरतं घेतलं. पंतप्रधानांच्या या भाषणानं देशवासियांना काय मिळालं, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना त्यांनी काय दिलासा दिला असे अनेक प्रश्न उपस्थित करत 'सामना' अग्रलेखातून भाजपला सणसणीत टोला लगावण्यात आला आहे.
उपरोधिक सूरात 'सामना'तून पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवरही निशाणा साधला गेला आहे. पंतप्रधानांची आपली अशी एक कार्यपद्धती आहे. त्यावर टीका होऊनही ते त्यांची कार्यपद्धती काही बदलत नाहीत हेच त्यांच्या भाषणातूनही स्पष्ट झाल्याचं य़ा अग्रलेखात म्ह्टलं गेलं. सुरुवातीला कोरोनासोबतचं युद्ध संपण्यासाठी २२ दिवस लागतील असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं, पण सात महिन्यांच्या कालावधीनंतरही देशाचं कोरोनासोबतचं युद्ध मात्र सुरुच आहे असं म्हणत परिस्थितीनुरुप केंद्राचे निर्णय आणि त्यांचे परिणाम यावर अग्रलेखातून प्रकाशझोत टाकण्यात आला.
राज्यपालांनी ऐकलं असेलच...
गर्दीच्या ठिकाणांची सुरुवात इतक्याच करता येणार नसल्याचंही पंतप्रधान या भाषणात म्हणाले होते. मुळात हा मुद्दा अधोरेखित करत शिवसेनेकडून राज्यपालांनीही त्यांचं हे वक्तव्य ऐकलं असेलच याकडे लक्ष वेधलं. सर्व धर्मियांना त्यांच्या सणांच्या शुभेच्छा देणारे आपले पंतप्रधान किती धर्मनिरपेक्ष आहेत याची नोंद राज्यपालांनी घ्यावी असं म्हणत भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांच्या पत्रातून केलेल्या मुद्द्याला अग्रलेखातही उत्तर देण्यात आलं.
बेरोजगारी, भारत- चीन संघर्ष या मुद्द्यांकडे न वळता पंतप्रधानांच्या भाषणाचा ओघ अध्यात्माच्याच कलानं जास्त असल्याचं म्हणत भाजपला शिवसेनेकडून सणसणीत टोला लगावण्यात आला. पंतप्रधानांचं नवं रुप आणि त्यांच्या तेजस्वी चेहऱ्यानंच देशातील संकटं दूर होणार अशी भाजपची समजूत असेल तर, त्यासाठी शिवसेनेकडून केंद्रातील या सत्ताधारी पक्षाला उपरोधिक स्वरात शुभेच्छाही दिल्या आहेत.