काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपीची विचारधारा समान होती का; संजय राऊतांचा सवाल
ईडी, आमदारांची फोडाफोडी हे सर्व प्रयत्न फसल्यामुळे भाजपकडून राष्ट्रपती राजवटीची तलवार काढण्यात आली आहे का?
मुंबई: जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाशी (पीडीपी) युती केली होती. तेव्हा आपली विचारधारा समान आहे का, हा प्रश्न भाजपला पडला नव्हता. त्यामुळे आता महाराष्ट्रातही कोणते पक्ष समान विचारधारेचे आहेत किंवा नाहीत, हे येणारा काळच ठरवेल, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. त्यामुळे वेळ पडल्यास शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करायला मागेपुढे पाहणार नाही, असे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी राऊत यांनी दिले आहेत.
ते शनिवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला. महाराष्ट्र हे लोकशाही, राजकारण, स्वातंत्र्य आणि समाजकारणाची जाणीव असलेले राज्य आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर १५ दिवसांतच कुणी महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादण्याचा विचार करत असेल तर हा राज्याचा अपमान आहे. यापूर्वीही केंद्रात आणि अनेक भाजपशासित राज्यांमध्ये सत्तास्थापनेसाठी उशीर झाला होता. आतादेखील ईडी, आमदारांची फोडाफोडी हे सर्व प्रयत्न फसल्यामुळे भाजपकडून राष्ट्रपती राजवटीची तलवार काढण्यात आली आहे का, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
भाजपला राष्ट्रपती म्हणजे काय खिशातला रबरी स्टॅम्प वाटतो का?- शिवसेना
मात्र, अशा धमक्या देऊन सत्तेत येण्याचा प्रयत्न होत असेल तर महाराष्ट्र त्याला भीक घालणार नाही. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल. ज्यांच्याकडे १४५ आमदारांचे बहुमत असले त्यांनी खुशाल राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करावा. मात्र, आताची वेळ ही सर्वच राजकीय पक्षांसाठी ठामपणे भूमिका घेण्याची आहे. जेणेकरून दबावाचे कोणतेही प्रयत्न सफल होणार नाहीत, असेही यावेळी राऊत यांनी म्हटले.
तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपकडून शिवसेनेला निर्वाणीचा इशारा
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीत काही बोलणी सुरु आहेत का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावेळी राऊत यांनी म्हटले की, शिवसेना आणि भाजप सोडून सर्व राजकीय पक्ष एकमेकांशी चर्चा करत आहेत. भाजपकडून चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ती निव्वळ अफवा आहे, मुळात अशी चर्चा कधी सुरूच झाली नव्हती. आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवली आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत युतीधर्माचे पालन करू, असे राऊत यांनी स्पष्ट केले.