मुंबई : काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांना विवेक अग्निहोत्री यानं 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटावाटे वाचा फोडली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच त्याची चर्चा पाहायला मिळाली. सध्या हा चित्रपट 150 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं असतानाच चित्रपटाच्या भोवती असणारं वादाचं वर्तुळ काही केल्या दुरावलं जाताना दिसत नाही. दर दिवशी या चित्रपटाशी संबंधित माहिती समोर येते आणि एकच वादंग माजताना दिसत आहे. 


आता म्हणे शिवसेना नेते संजय राऊत यांनी या बहुचर्चित चित्रपटासंबंधीची प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरवरल आधारित एक चित्रपट साकारला गेला खरा, पण त्यात बऱ्याच खोट्या गोष्टीही दाखवण्यात आल्या आहेत, असं ते म्हणाले. 


काय म्हणाले संजय राऊत? 
काश्मीर मुद्द्यावर साकारण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये बऱ्याच खोट्या गोष्टी दाखवल्याचं राऊत म्हणाले. भाजप या चित्रपटाची प्रसिद्धी करत आहे, तर त्यांचे समर्थक हा चित्रपट पाहणारच, आता तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार, दिग्दर्शकाला पद्मश्री मिळणार.... असा टोला त्यांनी लगावला. 


आतापर्यंत का नाही झाली काश्मिरी पंडितांची घरवापसी? 


चित्रपटाच्या दिग्दर्शकांचं नाव न घेता त्यांना मिळालेल्या Y दर्जाच्या सुरक्षेचा उल्लेख राऊतांनी केला. कश्मिरी पंडितांना फार अडचणींचा सामना करावा लागला, त्यांच्या घरवापसीचं आश्वासन तर पंतप्रधानांनी दिलं होतं, तर आतापर्यंत काहीच का नाही झालं? असा प्रश्नार्थक सूरही त्यांनी आळवला. 


संवेदनशील मुद्द्यावर राजकारण नको... 
काश्मीर मुद्दा हा अतिशय संवेदनशील असल्यामुळं यावर राजकारण करणं ठीक नसल्याचं ते म्हणाले. येत्या काळातील निवडणुकांचा संदर्भ लावत या चित्रपटाचा त्यावर फार फरक पडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. 


सध्याच्या घडीला भाजपची सत्ता असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त घोषित करण्यात आला आहे. खुद्द पंतप्रधानांनीही या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. त्यामुळं यातून मोठा रातकीय हेतू समोर येत आहे.