मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. याबाबत आम्ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे, अशी माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली. त्यामुळे आता सत्तासंघर्षाचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. आम्ही तीन दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, राज्यपाल यांनी मुदत वाढवून दिला नाही. त्यामुळे याविरोधात शिवसेना न्यायालयात गेली आहे, अशी माहिती परब यांनी दिली. दरम्यान, शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांच्याशी संपर्क करण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत कपिल सिब्बल तसेच काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत शिफारतीचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती हाती आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा सुटण्याची शक्यता कमी होत चालली आहे. भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला विचारणा केली. त्यांनी तसा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्र न मिळाल्याने शिवसेनेला संख्याबळ राज्यपालाना देता आले नाही. त्यानंतर शिवसेनेने दोन दिवसांची मुदत मागितली होती, ती देण्यात आली नाही. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसकडून बहुमताच्या आकड्यांची जुळवाजुळव सुरू असली तरी, त्यात यश येताना दिसत नाही. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे. आम्ही काँग्रेसच्या निर्णयाची वाट बघत आहोत, असे राष्ट्रवादीकडून सांगितले जात आहे. पण, तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन करण्यासंदर्भात काँग्रेसचा ठाम निर्णय होत नसल्याने सरकारचा तिढा कायम आहे.



दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवटीची तयारी सुरु झाली असल्याची माहिती आहे. सत्ता स्थापन करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने असमर्थता दाखवल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे या संदर्भातला अहवाल पाठवला आहे. त्यामुळे रात्री साडेआठनंतर महाराष्ट्रात कधीही राष्ट्रपती राजवट लागू शकते, अशी शक्यता आहे.


राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. केंद्रीयमंत्री मंडळाची बैठक झाली. त्यात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आल्याचे वृत्त आहे. जर राष्ट्रपती राजवट लागल्यास शिवसेना सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रपती राजवटीला आव्हान दिल्यानंतर बाजू मांडण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्याशी संपर्क सुरू केला आहे.