चिमुरड्यांचं पाठिवरचं ओझं कायम, सेनेची टॅब योजना मात्र गुंडाळली
२०१५ मध्ये २२ हजार ७९९ टॅबची खरेदी केली गेली. यासाठी १५ कोटी ६१ लाख रूपये खर्च करण्यात आले
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुलांचे दप्तराचे ओझे कमी होणार असल्याचा मोठा गवगवा करत बीएमसीत शिवसेनेने आणलेली टॅब योजना आता गुंडाळण्यात आल्याचे स्पष्ट झालंय. आदित्य ठाकरे यांची संकल्पनेला तिसऱ्या वर्षी सुरुंग लावण्यात आलाय. पहिल्यापासूनच वादग्रस्त राहिलेली ही योजना बीएमसीला राबवण्यात आता रस उरलेला नाहीय. ९ सप्टेंबर २०१५ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीएमसी शाळांमधील ८ वीच्या मुलांसाठी टॅब वितरणाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला होता. कशीबशी २ वर्षे ही योजना चाललीही आणि तिसऱ्याच वर्षी ती बंदही पडली.
२०१५ मध्ये २२ हजार ७९९ टॅबची खरेदी केली गेली. यासाठी १५ कोटी ६१ लाख रूपये खर्च करण्यात आले. तर २०१६ मध्ये सुमारे १६ कोटी रूपयांचे टॅब विकत घेतले. पण २०१७ मध्ये ३-४ वेळा टेंडर मागवूनही कुठलीच कपंनी टॅब पुरवठ्यासाठी पुढं आली नाही.
व्हिडिओकॉन कंपनीचे कालबाह्य आणि खपत नसलेले टॅब बीएमसीच्या माथी मारण्यात आल्याचा आरोप तेव्हा झाला होता. आता हे टॅब संपल्यानंतर ही योजना गुंडाळण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. आदित्य ठाकरेंच्या हट्टापायी बीएमसीचे ३२ कोटी रूपये पाण्यात गेले असून हे पैसे त्यांनी आता परत करावेत अशी मागणी मनसेनं केलीय.
तीन वर्षांपूर्वी टॅब योजनेवर भरभरून बोलणारे बीएमसीतील शिवसेनेचे पदाधिकारी आता मात्र याविषयी चक्कार शब्द काढण्यास तयार नाहीत. काँग्रेसनं या योजनेच्या अपयशाचे खापर सेनेवरच फोडलंय.
टॅब योजनेमुळं मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी झालं नसलं तरी संबंधित कंपनीचे न खपणारे टॅब सत्ताधाऱ्यांनी खपवून दाखवलेत.