मुंबई: औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेला डिवचणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेकडून चांगलाच समाचार घेण्यात आला. दादामिया तुम्ही गोधड्या भिजवत होतात तेव्हापासून शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत आहे, असा सणसणीत टोला शिवसेनेने लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी चंद्रकांत पाटील यांनी नुकताच औंरगाबादचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हायलाच पाहिजे. आपण औरंगजेबाचे वंशज नाहीत, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. 


आम्ही औरंगजेबाचे वंशज नाही- चंद्रकांत पाटील


या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे दादामियां आहेत. ते फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकून नको तिथे जीभ टाळ्यास लावीत आहेत. औरंगाबादचे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. भाजपच्या दादामियांचा आवेश आणि जोर पाहता त्यांची फक्त जीभच नव्हे तर बरेच काही सटकल्याचे दिसत आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत. दादामियांनी हे स्वत:च जाहीर करण्याचे कारण नाही. कारण, महाराष्ट्रात कोणीही औरंगजेबाचा वंशज नाही. औंरग्याला महाराष्ट्राने कायमचे गाडले आहे. त्यामुळे दादामियांसारख्या लोकांनी औरग्यांची कितीही पिसे काढली तरी महाराष्ट्रातील शांतता भंग पावणार नाही. असे अनेक दादामियां गोधड्या भिजवत होते तेव्हापासून शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत आहे, असा सणसणीत टोला या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.


शिवसेनेचं बेगडी हिंदुत्व लोकांसमोर आणा- चंद्रकांत पाटील


तसेच भाजपचे लोक आता कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ लागले आहेत. पाच वर्षे महाराष्ट्रात तुमचेच सरकार होते, केंद्रातही तुम्हीच आहात. तिकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्याच झटक्यात वाराणसीचे प्रयागराज केले. इतरही नावे-गावे बदलली. त्यांना कोणीच अडवले नाही. मग श्री. फडणवीस यांना कोणाची परवानगी हवी होती? पाच वर्षांत तुम्ही औरंगाबादचे 'संभाजीनगर' का करू शकला नाहीत?, असा सवालही या अग्रलेखातून भाजपला विचारण्यात आला आहे.