औरंगाबाद: आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत. औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचं 'संभाजीनगर' असे नामकरण झालेच पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते शनिवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्याला हात घातला. औरंगाबाद शहराचे नवा संभाजीनगर व्हायलाच पाहिजे. नामांतराच्या बाबतीत ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत. त्या लवकरात लवकर दूर केल्या गेल्या पाहिजेत. आपण औरंगजेबाचे वंशज नाहीत, असे पाटील यांनी म्हटले.
औरंगाबादमध्ये आतापासूनच आगामी महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आज औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्या. यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी औरंगाबदच्या नामांतरचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे आगामी काळात यावरून औरंगाबादमधील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) औरंगाबद नामांतराच्या मुद्द्यावरून आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी शिवसेना औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी आग्रही होती. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे शिवसेना या मुद्द्यावर काही करणार नाही, असा मनसेचा आरोप आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत मनसेकडून शिवसेनेला याच मुद्द्यावरून लक्ष्य केले जाऊ शकते.औरंगाबादमध्ये १२ मार्चला मनसेच्या वतीने तिथीनुसार येणारी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे या शिवजयंती सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.