`इतरांच्या खुर्च्यांना टेकू देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही`
भाजपने शिवसेनेला गृहीत धरू नये.
मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना यांची युती होणारच, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'सामना'तून फटकारण्यात आले आहे. फडणवीस सरकारला पाचव्या वर्षीत आगामी धोक्याची चाहूल लागली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांना शिवसेनाप्रेमाचा पान्हा फुटल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे.
तसेच आगामी निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेला गृहीत धरू नये, असा इशाराही सेनेने दिला. कोणत्या दिशेने जायचे ते आम्हीच ठरवू. चकव्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज नाही. हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ नये वगैरे दाखले आज दिले जात आहेत. मग २०१४ साली हा हिंदुत्ववाद व मतविभाजनाचा विचार कोणत्या कनवटीस खोचून ठेवला होता?, असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवर झालेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी 'सामना'तून सरकारवर करण्यात येणाऱ्या टीकेबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर मुख्यंमंत्र्यांनी, "सरकार 'सामना' चालवत नाही, मी चालवतो", अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती. फडणवीस यांच्या या वक्तव्याचाही शिवसेनेने समाचार घेतला आहे.
'सामना'च्या आगीशी खेळू नका. मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले ते 'सामना'च्या आगीने जळून खाक होईल. मुख्यमंत्र्यांना सकाळी उठून 'सामना' वाचावाच लागतो. सत्याचे कडू घोट पचवायला हिंमत लागते. 'सामना' हा जनतेचा लाऊडस्पीकर आणि खोटारडय़ांचा आरसा आहे, अशा शब्दांत शिवसेनेने फडणवीसांना खडे बोल सुनावले आहेत.