मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि ज्योतिबा फुलेंना भारतरत्न देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करु, असं भाजपने त्यांच्या जाहिरनाम्यात म्हटलं आहे. पण सावरकरांच्या भारतरत्नवरुन शिवसेनेने काँग्रेस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. सावरकरांना पळपुटा म्हणणारे राहुल गांधीच पळपुटे आहेत. निवडणूक झाल्यावर राहुल गांधी पळून गेले, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल मुंबईत झालेल्या सभेत केलं होतं. यानंतर आता सामनामधून भाजपवरही निशाणा साधण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सावरकरांच्या भारतरत्नसाठी शिफारस करु, असं आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात का द्यायचं? हे बरोबर नाही. भाजपच्या जाहीरनाम्यात या गोष्टी येणं क्लेशदायक आहे. मागच्या 5 वर्षांत सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने गौरवान्वित करायलाच हवं होतं. सरकार आपलंच होतं, असं सामनाच्या अग्रलेखात लिहिण्यात आलं आहे.


सामनाच्या या अग्रलेखातून काँग्रेसवरही निशाणा साधण्यात आला आहे. सावरकरांना पळपुटे म्हणणाऱ्या 'बँकॉक'फेम राहुल गांधींचं काय? राहुल गांधी सध्याच्या युगातील पहिल्या क्रमांकाचे पळपुटे आहेत. काँग्रेसला वाऱ्यावर सोडून ते पळून गेले. ते बँकॉकच्या एकांतवासात गेले आणि सावरकर अंदमानात चार वर्ष देशाच्या स्वातंत्र्यासाठी कठोर एकांतवास भोगत होते, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.


सावरकरांना आमचा विरोध नाही, तर त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला आहे. इंदिरा गांधींनी सावरकरांच्या टपाल तिकीटाचं अनावरण केलं होतं, असं वक्तव्य मनमोहन सिंग यांनी केलं होतं. तर सावरकरांची विज्ञानाचा आग्रह धरणारी मतं मला महत्त्वाची वाटतात, त्यामुळे त्यांची भारतरत्नसाठी शिफारस केली असेल, तर मला गैर वाटत नाही. भाजपने सावरकरांचं नेतृत्व कधीच मान्य केलं नाही, असं शरद पवार म्हणाले.


काँग्रेस नेते मनिष तिवारी आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी सावरकरांना भारतरत्न देण्याच्या प्रस्तावावरून भाजपवर टीका केली. सावरकरांना भारतरत्न द्यायचा असेल, तर नथुराम गोडसेलाही भारतरत्न द्या, असा टोला या दोघांनी लगावला.