मुंबई : जैन धर्मगुरू नय पद्मसागर यांच्या वादग्रस्त व्हिडिओ क्लीपवरून भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. मात्र शिवसेना आणि नय पद्मसागर यांचा बुरखा फाडणारा व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या पद्मसागरांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा प्रचार केला तेच आता मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीत शिवसेनेसाठी व्हिलन ठरले आहेत. पद्मसागर यांच्या माध्यमातून भाजपनं मतदानासाठी धार्मिक प्रचार केल्याचा आरोप करत शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय.


तसंच निवडणूक रद्द करण्याची मागणी केलीय. तसंच पद्मसागर हा झाकीर नाईक असून धर्मगरू नव्हे तर अतिरेकी असल्याची जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलीय. मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी हा झाकीर नाईक आणि राजकीय गुंड शिवसेनेला कसा चालला असा सवालही यानिमित्तानं उपस्थित झालाय.



दरम्यान संजय राऊत यांच्या आरोपांना भाजप नेते विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुनींच्या आशिर्वादानं मत मिळत असतील तर चांगली गोष्ट आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे, असं तावडे म्हणाले आहेत.


गिल्बर्ट मेंडोसा यांच्या आशिर्वादापेक्षा मुनींचा आशिर्वाद चांगला आहे. बाळासाहेबांची शिवसेना अशी वागू लागली आहे का? बाळासाहेब असते तर त्यांनी मेंडोसांना घेतले पण नसेत, असा टोमणा तावडेंनी लगावला आहे.