मुंबई : शिवसेना विरूद्ध आरजे मलिष्का वादाचे जोरदार पडसाद मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीतही उमटले. मलिष्काच्या घरी जाऊन डेंग्यूच्या अळ्यांबाबत नोटीस देण्याच्या मुद्यावर सपा गटनेते रईस शेख यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलिष्काला टार्गेट केलं जातंय. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, अशी भूमिका भाजपनं घेतली. तर मलिष्काच्या या गाण्यामागं कुणाचा हात आहे? तिला हे गाणं कुणी रचायला लावलं, याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेनं केली.


मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय म्हणणाऱ्या आरजे मलिष्काच्या घराची बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. बांद्रा पश्चिम, पालीनाका येथील सनराईज बिल्डींगमधील मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.


पण बीएमसीनं ही कारवाई सूडबुद्धीनं केल्याचा आरोप होत आहे. मलिष्कानं धाडसानं मुंबईकरांच्या समस्या गाण्यातून मांडल्या. तिच्या घरी महापालिका कर्मचा-यांनी जाणं आणि डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचं सांगणं योग्य नाही. महापालिका आयुक्तांनी यात लक्ष घालावं, असं ट्वीट मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी केलंय.


आशिष शेलार यांच्याबरोबरच काँग्रेस आमदार नितेश राणेही मलिष्काच्या मदतीला धावलेत. मलिष्का तू एकटी नाहीस. आम्ही आहोत तुझ्याबरोबर... वाघोबा करतो म्याव म्याव, आम्ही आणि मलिष्का बहिण भाव... अशी ट्वीटोळी नितेश राणेंनी केली आहे.