Maharashtra Mahayuti Government : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापना झाली, मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यामागोमागच खातेवाटपही झालं. असं असलं तरीही अद्याप राज्यात काही मंत्री वगळता उर्वरित मंत्र्यांनी मात्र खाती मिळूनही कारभार हाती घेतलेला नाही. ज्यावर ठाकरेंच्या शिवनेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर कैक दिवस लोटले, नवं वर्षही उजाडलं पण परिस्थिती जै से थे असल्यानं विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर सामनातून निशाणा साधण्यात आला आहे. 


अग्रलेखात म्हटलंय...


'राज्यात अनेक मंत्र्यांनी शपथ घेऊन कार्यभार स्वीकारलेला नाही. ज्यांनी तो स्वीकारला ते त्यांच्या कमिशनबाजीच्या खेळात गुंतले आहेत. ज्यांनी पदभार स्वीकारलेला नाही त्यातील कुणी रुसले आहे तर कुणी रुसून कोपऱ्यात बसले आहेत. अनेकांना चांगली खाती मिळाली नाहीत म्हणून त्यांचे जगणे बेचव बनले आहे. वास्तविक प्रत्येक खाते हे काम करणाऱ्यांसाठीच असते. चांगले काम करून ते अडगळीत गेलेले खाते लोकाभिमुख करता येते, पण विद्यमान मंत्र्यांना स्वतःची गॅरंटी उरलेली नाही. कमी दिवसांत जास्त कमवा. उद्याचा काय भरवसा? ही त्यांची वृत्ती आहे. 9 मंत्र्यांनी अद्यापि काम सुरू केलेले नाही. फडणवीस, नवे वर्षे उजाडले. ही जळमटे दूर करा!'


निवडणुकीआधी आणि निवडणुककीच्या निकालानंतर महायुतीकडून करण्यात आलेल्या घोषणाबाजीवरही ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली. महाराष्ट्र आता गतिमान होईल, थांबणार नाही... अशा घोषणा करत सरकार सत्तेवर आलं असलं तरीही प्रत्यक्षात मात्र कामाची बोंब दिसत असून, काही मंत्री तर कार्यालयात फिरकतही नाहीत ज्यामुळं मनाजोगं खातं न मिळाल्यानं त्यांची घुसमट स्पष्ट दिसत असल्याची बाब अग्रलेखातून नमूद करण्यात आली. विद्यमान सरकारमुळं जनतता हवालदिल असून, मुख्यमंत्री मनाने अस्थिर असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदे निराशेच्या गर्तेत आणि अजित पवारांची चारही बोटं तुपात अशी स्थिती असल्याचं अग्रलेखात लिहीण्यात आलं आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : पहाटे धुकं, दुपारी उकाडा, रात्री थंडी; तापमानातील चढ- उताराचा हवामानावर विपरित परिणाम 


 


फडणवीस, शिंदे, अजित पवारांची रिक्षा जागेवरच रुतून आणि रुसून बसली आहे असं म्हणत मंत्रीमंडळातील विविध खाती आणि त्या खात्यातून मंत्र्यांना होणारा नफा, इतकंच नव्हे तर काही आर्थिक उलाढालींवरही ठाकरे गटाच्या वतीनं प्रश्न उपस्थित करण्यात आले.