शिवसेनेचे सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत?
शिवसेना आमदारांची विकासकामं होत नसल्यामुळे सत्तेतून बाहेर पडावं, अशी मागणी पक्षाच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मंत्री रामदास कदम यांनी ही माहिती दिली.
मुंबई : शिवसेना आमदारांची विकासकामं होत नसल्यामुळे सत्तेतून बाहेर पडावं, अशी मागणी पक्षाच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मंत्री रामदास कदम यांनी ही माहिती दिली.
आता प्रत्येक विभागातल्या आमदारांची ठाकरे वेगळी भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतील आणि लवकरच योग्य निर्णय घेतील, असं कदम म्हणाले. मंत्र्यांनाच अधिकार नसल्यामुळे ते कुठून करणार, असा सूर त्यांनी लावला. या बैठकीत वाढत्या महागाईवर चर्चा झाल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. महागाईबाबत नाराजीचा शिवसेनेला फटका बसू नये, यावर चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
महागाईबाबत सरकारविरोधात महामोर्चा काढण्याचे संकेत राऊतांनी दिले. बैठकीला सर्व आमदार, खासदार आणि नेत्यांसह आदित्य ठाकरेही उपस्थित होते. आजच्या बैठकीत सर्वांना मोबाईल बाळगण्यास मनाई करण्यात आली होती. गेल्यावेळी बैठकीतला वाद चव्हाट्यावर आला होता. वादाची दृश्येही मीडियापर्यंत पोहचली होती. त्यामुळे शिवसेना नेतृत्वानं यावेळी खबरदारी घेतल्याचं बोललं जातं आहे.