COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : उद्या लोकसभेत मांडण्यात येणाऱ्या अविश्वास ठरावावर शिवसेना मोदी सरकारच्या बाजूनं मतदान करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करणार आहे. लोकसभेत अविश्वास प्रस्ताव तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी मांडला आहे. पण टीडीपीला फारसं महत्व देऊ नये अशी स्पष्ट भूमिका शिवसेना खासदारांनी मातोश्रीवर कळवल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.


शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर एअर इंडियासह इतर विमान कंपन्यांनी प्रवासबंदी घातली होती. रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी टाकली तेव्हा टीडीपीचे अशोक गजपती राजू हे नागरी हवाई वाहतूकमंत्री होते. प्रवासबंदी मागे घेण्याची मागणी शिवेसेनेने केली होती पण तेव्हा त्यांनी अशोक गजपती राजू यांनी त्यांची मागणी मान्य केली नव्हती. गायकवाड या्ंच्यावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप झाला होता.


भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. शिवसेनेनं सरकार सोबत राहवं अशी विनंती अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना केल्याचीही माहिती पुढे आली आहे.


एनडीएचे लोकसभेत 310 खासदार आहेत. लोकसभेत शिवसेनेच्या खासदारांची संख्या 18 आहे. मोदी सरकारविरोधातील हा ठराव मांडला असला तरी संख्याबळ असल्याने त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. पण विरोधी पक्ष या निमित्तान एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.