मुंबई : झेंडा बदलल्यानंतर निघालेल्या मनसेच्या पहिल्याच मोर्चानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. मनसेचा जोश पाहून शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडी आणि आता मनसे भाजपची बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेच्या आरोपाला मनसेनंही उत्तर दिलंय. शिवसेना ही राष्ट्रवादीची बी टीम असल्याचा प्रत्यारोप मनसेनं केला आहे.


दुसरीकडं भाजपनंही मनसेबाबत सौम्य धोरण स्वीकारलं आहे. मनसे जर हिंदुत्ववादी भूमिका घेत असेल तर स्वागत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. पण तातडीनं युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.


शिवसेनेची युतीतली पोकळी भरुन काढणारा पक्ष म्हणून भाजपचे धुरीण मनसेकडं पाहतात. येत्या काळात मनसेचं इंजिन कमळासोबत धावायला लागलं तर आश्चर्य वाटायला नको.


दरम्यान आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मुंबईत घुसखोरांविरुद्ध महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्च्यासाठी राज्यभरातून मनसेचे नेते आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. भारत माता की जय, शिवरायांचा जयघोष करत कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते.