मुंबई : शिवसेनेला सत्तेत आता मोठा वाटा हवा आहे. यासाठी शिवसेना आता ताणून धरण्याच्या मनस्थितीत आहे. शिवसेना सत्तावाटपाच्या १९९५ च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेनं सत्तेत समान वाटणी मागून भाजपाची चांगलीच अडचण केली आहे. २०१४ मध्ये जी मंत्रिपदं भाजपनं दिली ती शिवसेनेनं मुकाटपणे घेतली. पण आता शिवसेना कुणाचंही ऐकायच्या मानसिकतेत नाही. सत्तेतल्या वाट्यासाठी शिवसेनेला १९९५ च्या फॉर्म्युला आदर्श वाटतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडं, उपमुख्यमंत्रिपद गृहमंत्रिपद, अर्थ, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे खाते भाजपकडं होतं. या फॉर्म्युल्य़ानुसार शिवसेना कदाचित मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडू शकते, पण त्यासाठी शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद, अर्थखातं, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा खात्यासारखी महत्त्वाची खाती हवी असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 


मागील सरकारमध्ये शिवसेना सामील होती. पण थेट जनमानसावर परिणाम करणारी किंवा छाप पाडणारी खाती शिवसेनेला मिळाली नव्हती. आता मात्र शिवसेनेला राज्यात राज्यकर्ता व्हायचंय. विद्यमान राजकीय स्थितीत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत गेलीय. त्यामुळं शिवसेनेचा वाघ आता भाजपाकडून किती आणि काय काय पदरात पाडून घेतो याची उत्सुकता आहे.