मुंबई: मुंबईत आल्यानंतर कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, अशी वल्गना करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतला शिवसेनेकडून लवकरच प्रत्युत्तर दिले जाणार आहे. येत्या ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. त्यावेळी शिवसेना कंगना राणौतला नेहमीच्या स्टाईलने प्रत्युत्तर देईल. आपण बघत राहा, असा इशारा शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी दिला आहे. त्यामुळे आता ९ तारखेला नक्की काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी पोकळ धमक्या देत नाही, संजय राऊतांचा इशारा

कंगना राणौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यानंतर कंगनावर सर्व माध्यमांतून टीकेचा भडिमार सुरु आहे. मात्र, कंगनाने आपण या सगळ्या धमक्यांना भीक घालत नसल्याचे सांगितले. अनेकांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवास करणार आहे. मुंबई एअरपोर्टला उतरण्याची वेळ मी तुम्हाला ठरली की सांगेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, असे ट्विट कंगनाने शुक्रवारी केले. त्यामुळे वातावरण आणखीनच तापले आहे. 


कंगना म्हणजे झाशीची राणी; शिवसेना नेत्यांच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही- राम कदम

दरम्यान, कंगनाला झाशीची राणी संबोधत तिचे समर्थन करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधातही शिवसेना आक्रमक झाली आहे. राम कदम यांच्या घाटकोपरच्या घरावर शिवसेनेच्या महिला आघाडीकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे यानिमित्ताने शिवसेना आणि भाजपमधील वातावरणही तापण्याची शक्यता आहे.