मुंबई: महाराष्ट्रात शिवसेनाचा मोठा भाऊ राहील. भाजपकडून आम्हाला सन्मानजनक प्रस्ताव आला तर युतीचा विचार करू, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी भाजपकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, महाराष्ट्रात शिवसेना कायमच मोठा भाऊ राहील. हा मोठा भाऊ दिल्लीचे तख्त गदागदा हलवेल. मात्र, भाजपकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास शिवसेना युतीसंदर्भात नक्की विचार करेल. शिवसेना त्यावर सकारात्मक विचारही करेल. येत्या आठवड्याभरात यासंदर्भात निर्णय होईल, असे राऊत यांनी सांगितले. तसेच खुद्द उद्धव ठाकरे यांनी खासदारांना युतीचे संकेत दिल्याची चर्चा आहे. युती करायची की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घ्यावा, अशी भूमिका खासदारांनी बैठकीत मांडली. परंतु विधानसभा निवडणुकीत मोठ्या भावाचा मान मिळाला तर युती होऊ शकते, असे संकेत या बैठकीनंतर मिळाले. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 याशिवाय, बैठकीत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पक्षाकडून मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. देशभरात आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्वांचाच प्राप्तिकर माफ व्हावा. सर्व गरिबांसाठी हाच एक मोठा दिलासा असेल, असा ठराव या बैठकीत शिवसेना खासदारांनी मंजूर केला. ३१ जानेवारीपासून दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यावेळी शिवसेना खासदारांकडून ही मागणी रेटली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार पाच लाखांपर्यंत वार्षिक उत्त्पन्न असलेल्यांना प्राप्तीकरातून सूट द्यायला तयार आहे. त्यामुळे शिवसेना खासदारांच्या मागणीवर भाजपचे मंत्री काय उत्तर देणार, हे पाहणेही औत्स्युकाचे ठरेल.