मुंबई : शिवसेना आणि भाजपमधील कटुता संपायचे नाव घेत नाही. आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपला उमेदवार आताच जाहीर केलाय. त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची 'मातोश्री' भेट व्यर्थ ठरणार असल्याचे दिसत आहे. आज पालघर येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा पोटनिवडणुकीत जनतेने जो कौल दिला त्याबद्दल मतदारांचे जाहीर आभार मानले. यावेळी पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी देणार असल्याचे उद्धव यांनी जाहीर केले आहे.


'साम-दाम-दंड-भेद वाल्यांना घाम'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला भाजपविरोधी सूर कायम ठेवला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीबाबत शक्यता कमी असल्याचे एक प्रकारे संकेत दिलेय. शिवसेनेने पालघरमध्ये साम-दाम-दंड-भेद वाल्यांना घाम फोडला. आता नाटकं सुरु आहेत, पिक्चर अभी बाकी हैं , असे विधान उद्धव यांनी केले आहे. त्यामुळे यापुढे युती होणार नाही, असे दिसून येत आहे. पालघरमध्ये निवडणूक प्रचारादम्यान पैसे वाटण्यात आले, त्यांच्यावर अजून कारवाई का झाली नाही ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.


सेना-भाजपात टोकाचा संघर्ष 


श्रीनिवास वनगा दिवंगत भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे सुपूत्र आहेत. त्यांना शिवसेनेत घेऊन त्यांनाच लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. त्याआधी शिवसेनेने यापुढील निवडणुका स्वबळावर लढविण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे भाजपविरोधात शिवसेनेने आपला उमेदवार दिला. यावरुन भाजप आणि शिवसेनेत टोकाचा संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाला. भाजपनेही शिवसेनेविरोधात आक्रमकपणा घेतला. काँग्रेसचा उमेदवार पळवून भाजपने त्यालाच उमेदवारी दिली. राजेंद्र गावित यांनी या निवडणुकीत बाजी मारत शिवसेनेला पराभूत केले. मात्र, शिवसेनेने स्वबळावर जोरदार टक्कर देत भाजपचा घाम काढल्याचे चित्र दिसून आले.


स्वबळावर लढण्याचा निर्धार


दरम्यान, शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय आधीच घेतला असून तसा ठराव देखील पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. आता या निर्णयात बदल होणार नाही, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. भाजपवर नाराज होऊन स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे, असे राऊत यांनी म्हटलेय. त्यामुळे युतीचे काही खरं नाही, असेच दिसत आहे.