मुंबई: पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी मारायचे ठरवले असल्याचं उघड झाले. मात्र, या हत्या कटाचा जो उत्सव साजरा आपल्या मतलबासाठी सुरू आहे तो निषेधार्ह आहे. मुळात पंतप्रधान मोदी यांनी त्यांची सुरक्षा 'मोसाद'च्या धर्तीवर बनवली आहे. त्यांची सुरक्षा भेदून आकाशात एखादं पाखरूही फडफड करू शकणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्रयांनी तर मंत्रालयालाचा सुरक्षेचा किल्ला बनवल्याने तिथे सामान्य जनतेचे येणे-जाणे थांबले आहे.  या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एक कट उघड केला जातो व त्यातून हे थरारक प्रकार बाहेर येतात हे एखाद्या रहस्यमय आणि हॉरर सिनेमाच्या पटकथेप्रमाणे आहे, अशा शब्दात पंतप्रधानांच्या हत्येचा नक्षलवाद्यांच्या कटाची शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून चिरफाड करण्यात आलीय. मोदी आणि फडणवीस यांच्या हत्येच्या कटाचा धागा पकडत, सामनामधून उपहासात्मक टीका करण्यात आलीय... पाहुया सामनामध्ये काय म्हटलंय.


...म्हणून आम्हला चिंता वाटते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका बाजूला चार लाख राउंड फायर करण्याची क्षमता असलेले 'एम-4' हे शस्त्र खरेदी करण्याचा प्लॅन नक्षलवादी करतात व त्याच वेळेला मोदी-फडणवीस यांना मारण्याचा कट रचणारे एक पत्र मागे सोडतात हे कारस्थान पटणारे नाही अशी शंका आता तज्ञानी उपस्थित केली आहे. भीमा-कोरेगावच्या दंगलीमागचे सूत्रधार मोदी-फडणवीसांना मारण्याचा कट रचत होते. हे सगळं रोमांचक तितकेच थरारक आहे. अर्थात या कथानकात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळे विरोधकांना टिकेस वाव मिळाला आहे. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस दिल्लीत हमखास अतिरेकी पकडले जातात व स्वातंत्र्यदिन उधळायचा कट असल्याचे सांगून सुरक्षा व्यवस्था तेवढ्यापुरती 'टाइट' केली जाते. मग उरलेले ११ महिने हे अतिरेकी नेमके काय करीत असतात? निवडणुकांच्या तोंडावर राज्यकर्त्यांच्या हत्याकांडाचे स्फोट नेहमीच होत असतात, पण महाराष्ट्रात व देशात निवडणुकांना अवकाश आहे. तरीही कट उघड झाला म्हणून आम्हला चिंता वाटते.


लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत


पंतप्रधानांची सुरक्षा आहे त्यापेक्षा मजबूत करता येईल काय व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 'मोसाद'च्या धर्तीची सुरक्षा पुरवता येईल काय यावर गांभीर्याने विचार करावा लागेल. कारण पुन्हा तेच. लाख मेले तरी चालतील ( तसे ते मरतच आहेत ), पण लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत. आम्ही मोदी व फडणवीस यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य चिंतीत आहोत.