Disha Salian Death Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरण आपण हाताळलंच नसल्याचं सीबीआयनं (CBI) सांगितलंय. हे प्रकरण आपल्याकडे सोपवण्यात आलं नव्हतं. त्यामुळे या प्रकरणात सीबीआयचा अहवाल असल्याची विधानं पूर्णपणे चुकीची असल्याचं स्वतः सीबीआयनं सांगितलं आहे. दिशा सालियन हिची हत्या की आत्महत्या यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या प्रकरणी राज्य सरकारनं एस आय टी (SIT) ची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीआयनं दिलेली ही माहिती महत्त्वपूर्ण ठरत आहे. सीबीआयकडून याबाबत अधिकृत स्टेटमेंटही जारी करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे पडसाद विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले.  दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogowale) आणि भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) केली. दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यावर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत केली जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली. याप्रकरणात पोलीस तपास सुरु आहे, ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी पुरावे द्यावेत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 


खासदार राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप
खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) A U नावाने 44 फोन आले होते, हा A U म्हणजे आदित्य-उद्धव (Aditya-Uddhav Thackeray) असल्याची बिहार पोलिसांनी (Bihar Police) माहिती दिल्याचा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला होता. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही (Winter Session) उमटले. 


आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर
सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आरोपांना आदित्य ठाकरे यांनीही उत्तर दिलंय दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी माझ्या आजोबांचं निधन झालं होतं.  आम्ही राज्यपाल हटावची मागणी करत आहोत, त्यांना वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न आहे. घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. एनआयटीचा जो घोटाळा आहे, तो आम्हाला हाऊसमध्ये काढू देत नाहीएत, त्यासाठी हे सर्व सुरु आहे. 32 वर्षाच्या तरुणाने या खोके सरकारला हलवून ठेवलंय असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं..