प्रथमेश  तावडे, झी मीडिया, वसई : वसईत (Vasai) पोलीस भरतीसाठी (Police Recrutiment) सराव करताना एका 22 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रतीक महेंद्र मेहेर असं या तरुणाचे नाव असून तो मूळ विरारच्या अर्नाळा परिसरात राहणारा आहे.  पोलीस भरतीचा सराव करताना प्रतीकला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला मृत्यूने कवटाळलं.  वसई पोलीस ठाण्यात (Vasai Police) या घटनेची  नोंद करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पोलीस शिपाई भरती होणार आहे. यासाठी अर्ज भरण्याचा कालावधी सुरु असून इच्छुक तरुण वर्ग यासाठी जोमाने सर्व तयारी करताना दिसत आहे. वसईतीलही अनेक तरुण यासाठी प्रयत्न करत असून त्यांचा सराव सुरु आहे.


यापैकीच एक मूळचा अर्नाळा इथल्या रानगाव इथं राहणाऱ्या प्रतीक महेंद्र मेहेर याने देखील यासाठी सराव सुरु केला होता. लहानपणापासून पोलिसात भरतीचे होण्याचे स्वप्न पाहत असलेल्या या तरुणासाठी राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीमुळे एक संधी चालून आली होती. अर्ज भरल्यानंतर त्याने भरतीपूर्व सराव सुरु केला होता.


यासाठी व्यायाम, धावणे त्याचे नियमित सुरु होते. सोमवारी सायंकाळी प्रतीक वसईतील रस्त्यावर धावण्याचा सर्व करत होता. मात्र अचानक त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला. यामध्येच त्याचा मृत्यू झाला आहे. प्रतीकच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून प्रतीकच पोलिसात भरती होण्याचे स्वप्न देखील भंग झाले आहे.