कृष्णात पाटील / मुंबई : कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. मुंबईतील कोरोनाचा गुणाकार हा कमी झाला असला तरी रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत कोरोनाची स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांनी केईएम रुग्णालयातील शवागृह भरले आहे. धक्कादाकय बाब म्हणजे शवागृहात मृतदेह ठेवण्यास जागा नसल्याने बाहेरच्या कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ, रुग्णालय प्रशासनावर आली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील महत्वाच्या रुग्णालयांपैकी केईएम रुग्णालय आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत. येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेतला येथे कोरोना बाधित रुग्ण जास्त येत आहेत. तसेच कोरोनाच्या विषाणूमुळे मृत्यू झाल्यांची संख्याही जास्त असल्याचे दिसून येत आहे.  २७ मृतदेह ठेवण्याची शवागृहाची क्षमता संपल्याने १० मृतदेह कॉरीडोरमध्ये ठेवण्याची वेळ मुंबई पालिकेच्या रुग्णालय प्रशासनावर आली आहे.


केईएम रुग्णालयात सध्या एकूण ३७ मृतदेह आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांत शवागृहातील सात कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शवागृहात आता कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. शवागृहात जागा कमी, रुग्णालयात कर्मचारी कमी या कात्रीत प्रशासन सापडल्याचे दिसून येत आहे.