मुंबई : 'ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन'चे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर मुंबईत एका व्यक्तीनं चप्पल फेकल्याची घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी रात्री १० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. पक्षाच्या एका रॅलीत तीन तलाकच्या मुद्द्यावर ओवैसी बोलत असताना एका व्यक्तीनं त्यांच्यावर चप्पल भिरकावली. 


प्रसंगावधान राखत ओवैसी यांच्या सुरक्षा रक्षकांनी ही चप्पल वेळीच रोखली. त्यामुळे ही चप्पल ओवैसी यांना लागली नसली तरी उपस्थितांना मात्र या अचानक घडलेल्या घटनेनं चांगलाच धक्का बसला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. 


सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्लेखोराची ओळख पटवली आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. 


हे सर्व निराश लोक आहेत. तीन तलाकवर सरकारचा निर्णय मुस्लीम जनतेला स्वीकार नाही, हे जे लोक पाहू शकत नाहीत ते हे लोक आहेत... जे महात्मा गांधी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांची विचारसरणी फॉलो करतात ते हे लोक आहेत... असं म्हणत या हल्ल्यानंतर ओवैसी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.


'तीन तलाक' पीडित महिलांना महिना १५ हजार रुपये देण्याची मागणी ओवैसी यांनी केलीय... याची तरतूद सरकारनं अर्थसंकल्पात करावी अशीही त्यांची मागणी आहे... 


'तीन तलाक' विधेयक लोकसभेत संमत झालंय पण राज्यसभेत मात्र हे अद्यापही संमत होऊ शकलेलं नाही.