दीपक भातूसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनामुळे दोन आठवडे होऊ न शकलेल्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुकानांच्या पाट्यांवर इंग्रजीत नाव मोठ्या अक्षरात लिहलं जात असल्याचं लक्षात आलं आहे. पण यापुढे दुकानांच्या पाट्यांवर इंग्रजी अथवा इतर भाषेत जेवढ्या मोठ्या अक्षरात नाव लिहलं जाईल तेवढ्याच मोठ्या अक्षरात मराठीत नाव लिहणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता, पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. अनेक दुकानदार त्यातून पळवाटा काढत होते. दुकानाचं इंग्रजी नाव मोठ्या अक्षरात आणि मराठी नाव छोट्या अक्षरात लिहिलं जात होतं. पण आता प्रस्ताव मंजूर झाल्याने दुकानदानदारांना मराठी नावही मोठ्या अक्षरात ठेवावं लागणार आहे. 



कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसंच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे. 


मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरुष/महनीय महिला यांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला.