मुंबई : मुंबईत लेप्टोचा आणखीन एक बळी गेलाय. लेप्टोचा मुंबईतील हा चौथा मृत्यू ठरलाय. भांडुप पुर्व इथं राहणाऱ्या सिद्धेश माणगावकर या तरुणाचा लेप्टोस्पायरसीस मुळे आज सकाळी मृत्यू झालाय. गेल्या शुक्रवारी १३ जुलै रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने सिद्धेश ऑफिसहून घरी आला. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तातडीने मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. किडनी, हृदय, फुफुस असे एक एक अवयव निकामी होत गेले आणि आज सिद्धेशने अखेरचा श्वास घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णालयात दाखल केल्यापासून सिद्धेश बेशुद्धावस्थेत होता... तो शुद्धीत आलाच नाही. सिद्धेशचे आई-वडील आणि एक धाकटी बहीण आहे. कर्ज काढून मुलाला इंजिनियर केलेल्या आईवडीलांचा आधार हरपलाय.


प्रामुख्याने उंदीर किंवा इतर कोणत्याही लेप्टोस्पायरोसिसने बाधीत प्राण्याचे मलमूत्र, माती, पाणी, अन्न, पेयजल आदींच्या संपर्कात माणूस आल्यास जखमेद्वारे अथवा तोंडाद्वारे लेप्टोस्पायरोसिसचे जिवाणू व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिस आजार उद्भवतो.  


याअगोदर,  २७ जून रोजी मालाडमधील एका २१ वर्षीय तरूणीचा लेप्टोमुळे मृत्यू झाला होता. तर कुर्ला आणि गोवंडीतही लोप्टोमुळे प्रत्येकी एक बळी गेला आहे.