मुंबई : ऐन ख्रिसमसच्या दिवशी मध्य रेल्वेने कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान घेण्यात आलेल्या पॉवरब्लॉकमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. रेल्वे ५ तास बंद असल्यामुळे प्रवाशांनी पर्यायी वाहनांचा मार्ग अवलंबला. पण या परिस्थित कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी प्रवाशांची प्रचंड लूट केली. पॉवरब्लॉकदरम्यान करण्यात आलेल्या सुविधा आणि उपाययोजना तुटपुंजी ठरल्या. बससेवा देखील तत्पर सेवा देऊ शकल्या नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे प्रवाशांनी आपला मोर्चा रिक्षांकडे वळवला. जे रिक्षाचालक कल्याण डोंबिवलीसाठी एरवी २० ते २५ रूपये भाडं आकारतात. तेच त्यांनी आज प्रवाशांकडून तब्बल १०० ते १५० रूपये आकारले. यामुळे प्रवाशांना प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. 


पर्यायी प्रवाशांनी कल्याण-ठाकुर्ली, कल्याण डोंबिवली रेल्वे ट्रॅकवरून चालत अंतर गाठलं. नाताळच्या सुट्टीच्या निमित्ताने मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली स्थानकात पादचारी पूलाचे गर्डर टाकण्यासाठी कल्याण-डोंबिवली दरम्यान धीम्या-जलद मार्गावर तब्बल चार तासाचा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. 


ऐन सकाळी कामावर जाण्याच्यावेळी हा मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने रेल्वे फलाटावर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकर चाकरमण्यांचे मेगा हाल झाले. मेगा ब्लॉक प्री प्लॅन असतानाही रेल्वे प्रशासनाला नियोजन करता आले नाही. 


त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला. दुपारी दोन नंतर लोकलसेवा पूर्ववत सुरू झाली. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पादचारी पुलावर ४०० मेट्रिक टन वजनी ६ मीटर रुंदीचे ४ गर्डर टाकण्यात आले. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सकाळी ९.४५ ते दु. १.४५ या काळात कल्याण डोंबिवली रेल्वे मार्गावर विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला होता.