दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : गोष्ट एका सिंहासनाची... राज ठाकरे यांनी यापुढे फक्त सिंहासनावरच बसावं, अशी त्यांच्या एका चाहत्या कुटुंबाची इच्छा होती... पाहुयात काय झालं त्यांच्या या इच्छेचं!


'कृष्णकुंज'वर चांदीचं सिंहासन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी सकाळी 'कृष्णकुंज'वर अचानक एक सिंहासन येऊन धडकलं... आर्थिक सुबत्ता आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचीही रुची असलेल्या पुण्यातल्या विधाते कुटुंबियांनी केलेली ही कमाल होती... कुटुंबातले सर्वच सदस्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निस्सीम चाहते... आणि आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी ठाकरेंसाठी चक्क एक चांदीच सिंहासन तयार करून घेतलं.


कार्यकर्त्यांचा गोंधळ


शनिवारी सकाळी सिंहासनासोबतच विधाते कुटुंबियांनी कृष्णकुंज गाठलं... त्यांना सिंहासन राज ठाकरे यांना भेट द्यायचं होतं... पण त्याची कुठलीही कल्पना त्यांनी ठाकरे यांना दिली नव्हती. त्यामुळे 'कृष्णकुंज'वर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा थोडा गोंधळच उडाला. पण आपल्या चाहत्यांचा अगदीच हिरमोड होऊ नये, याचीही काळजी ठाकरे यांनी घेतली.


त्यांनी घराबाहेर येऊन चाहत्यांचा भावनांचा मान राखला... ठाकरेंनी सिंहासनातले बारकावेही पाहिले... पण सिंहासन घेण्यास त्यांनी नम्रपणे नकार दर्शवला...


'पुढचा मुख्यमंत्री मनसेचाच!'


बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरे यांनीही सिंहासनावर बसून पक्ष चालवावा, ही त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. ती पूर्ण होऊ शकली नाही... पण, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मनसेचाच होणार असा अभिप्राय आपल्या स्वाक्षरीसह देत ठाकरेंनी चाहत्यांना निराश केलं नाही.


शुक्रवारी विश्वसुंदरीच्या सदिच्छा भेटीनिमित्तानं हिरेजडित मुकुट 'कृष्णकुंज'वर आला होता. त्यापाठोपाठ शनिवारी सिंहासनही आलं... अचानक हे योग जुळून येऊ लागल्यानं आता सत्ताही अशीच चालत यावी, अशी प्रामाणिक इच्छा मनसे कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण न झाली तर नवल!