मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोच आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त मुंबईत आढळले आहेत. दादर पश्चिममधील एकाच घरातील 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चितळे पथ येथील एका इमारतीतील एकाच घरातील 6 जण कोरोनाबाधित असल्याचं उघड झालं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कुटुंबातील एका व्यक्तीची तीन दिवसांपूर्वी कोविड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर इतर कुटुंबियांचीही चाचणी करण्यात आली. त्या चाचणीत इतर 5 जणांचीही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दादरमध्ये आता कोरोनाग्रस्तांची संख्या 9वर पोहचली आहे.



देशात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 993वर पोहचली आहे. तर मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एका दिवसांत 92 रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 1166 वर गेली आहे. 


मुंबईत झपाट्याने वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या मोठी चिंतेची बाब ठरत आहे. मुंबईतील झोपडपट्टीमध्ये कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. धारावीत आणखी 6 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 28 वर पोहोचली आहे. झोपडपट्टीमध्ये दाटीवाटीने राहणाऱ्या परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव मुंबईसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. 


कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी याठिकाणी दोन दिवसा पूर्ण बंद पाळण्यात येणार आहे. केवळ वैद्यकीय सेवा सुरु राहणार आहे. कुर्ला चुनाभट्टी भागात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गर्दी कमी होत नसल्याने दोन दिवसांचा पूर्ण बंद पाळण्यात येत आहे. 


देशातील 21 दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिलनंतर संपणार आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.