मध्य रेल्वेवर आजपासून धावणार धीम्या लोकल
आजपासून रेल्वेच्या नव्या फेऱ्या
मुंबई : मध्य रेल्वेवर जलद लोकल धावत असल्यामुळे मधल्या स्थानकांतील प्रवाशांची गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी आता धीम्या लोकलही सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. १० ऑक्टोबर म्हणजे आजपासून २२ नवीन धीम्या लोकल फेऱ्या होणार आहेत. सीएसएमटी ते कसारा, कर्जत मार्गावर १८ आणि सीएसएमटी ते पनवेल मार्गावर चार फेऱ्या होणार आहेत. मात्र ही लोकल फक्त चार स्थानकांत थांबवण्यात येणार आहेत.
धीम्या लोकल फेऱ्या सीएसएमटी ते कसारा मार्गावर चालवताना थानशेत आणि उंबरमाळी स्थानकात थांबा देण्यात आलेला नाही. तर सीएसएमटी ते कर्जत मार्गावरही शेलू स्थानकात थांबणार नाहीत. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल चार धीम्या लोकल फेऱ्यांनाही रे रोड, कॉटन ग्रीन, चुनाभट्टी, मानसरोवर स्थानकांत थांबा नसेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
त्यामुळे या स्थानकांतून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांची गैरसोयच होणार आहे. ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर सध्या सहा लोकल फे ऱ्या होत असून त्यांना काही मोजक्याच स्थानकांत थांबणार आहेत. या मार्गावर मात्र धीम्या लोकल चालवण्याविषयी निर्णय झालेला नाही.
तसेच सर्वसामान्यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे बंधन पाळले तर लोकल प्रवासाची परवानगी देण्यास हरकत नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात म्हटले आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मूभा आहे. रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यास हरकत नाही, असेही राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी म्हटले आहे.