मुंबई : आमच्या मुंबईच्या मध्यमवर्गीय माणसांना परदेशासारख्या वातावरणाचा अनुभव घेऊ द्या ना, यांची नक्की काय पोटदुखी आहे ते कळत नाही. टीका करून त्यांना फक्त चमकायच असतं. आम्ही मराठी नाव देऊ शकतो अडचण काहीच नाही. हत्तीच्या येणाऱ्या बाळाचं नाव 'चंपा' आणि माकडाच्या बाळाचं नाक 'चिवा' ठेवू, असा खरमरीत टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचे नाव 'ऑस्कर' आणि वाघाच्या बछड्याचे नाव 'वीसा' ठेवण्यात आलं आहे. त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटवर मराठीला फक्त पाट्यांपुरता भाव, युवराजच्या पेंग्विनचं इंग्रजीत नाव? साहेबांनी मराठी पाट्या लावायला सांगितल्या आहेत. मराठी नामकरण करण्यास नाही, अशी खोचक टिपण्णी केली होती.


त्यावरून महापौर पेडणेकर यांनी वाघ यांच्यावर पलटवार केला आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील हत्तीण आणि माकड यांनाही पिल्ले होणार आहेत. त्यामुळे त्यांची नावे मराठीत ठेवण्यास काहीच अडचण नाही. ऑस्कर पुरस्कार चालतो मात्र ते नाव चालत नाही ? मग, चंपा, चिवा ही नावे ठेवावे का? एवढ्या खालच्या स्तरावर येऊन टीका करण्यामागे यांची नक्की काय पोटदुखी आहे ते कळत नाही.  टीका करून त्यांना फक्त चमकायच असतं, असा टोला लगावला आहे.


आधी बिल्डर, आता आमदार
राणीबागेत दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेत १०६ कोटींचा गैरप्रकार झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला. मात्र, निविदा देण्याची एक प्रक्रिया असते. ही प्रक्रिया नियमानुसार करण्यात आली आहे. याबाबत कोणाला आक्षेप नाही. केवळ दोन कंपन्यांनी निविदेला प्रतिसाद दिला आहे. मिहीर कोटेचा हे आधी बिल्डर होते आणि आता आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी अभ्यास करावा. विनाकारण आरोप करू नये असे महापौरांनी सुनावले. 


मुंबईकरांचा सिंहाचा वाटा
मुंबईत कोरोना रुग्ण संख्या चार पटीने कमी होत आहे. आरोग्य यंत्रणेवर स्वतः मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. मुंबईत परिस्थिती नियंत्रणात येत आहे यात मुंबईकरांचा सिंहाचा वाटा आहे. पालकवर्ग आजही धास्तावलेला आहे. मात्र, ज्या पालकांना आपल्या पाल्यास शाळेत पाठवायचं आहे त्यांनी संमतीपत्र द्यावे. मुलांना लसवंत करा, अफवांना बळी पडू नका. ज्यांनी अफवा पसरवली त्यांच्या विरोधात सायबरमध्ये गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देतानाच २२ जानेवारीला मुलांचं मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.