तर, आणखी आत्महत्या होतील... फडणवीस यांनी का दिला सरकारला हा गर्भित इशारा
शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावरून विधानसभेत देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या कारभारावर टीका केलीच. फडणवीस यांनी पंढपूर येथील आत्महत्या केलेल्या तरुणाचा दाखला देत सरकारला थेट इशाराच दिला.
मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत आज विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा मंत्री डॉ. नितिन राऊत यांनी उत्तर देत विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा देत सरकारच्या उत्तरातील हवाच काढून टाकली.
ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांनी चालू महिन्याचे बिल भरले तर त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही. त्यांच्या थकीत बिलाची जी रक्कम आहे त्याचे त्यांना हप्ते करून दिले जातील. त्यानुसार बिल भरण्याची त्यांना सूट देण्यात येईल, असे सांगितले.
यावर देवेंद्र फडणवीस यांनी १८ महिने वीज बिल व्याजासह भरा असे सरकारने सांगितले आहे. पण, शेतकरी वीज बिल भरू शकत नाही. आता चालू बिल भरून कनेक्शन कापणार नाही असे सांगत आहेत. पण, चालू वीज बिलामधून चालूपणा करू नका, तुम्ही डाॅक्टर तुम्ही आहेत. त्यामुळे वकीलाचे उत्तर नको असे सुनावले.
पंढरपूर येथे सूरज जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या शेतकरी केली. त्याच्या कुटुंबियांसोबत फोनवर बोललो. त्यावेळी त्यांनी सांगितले कि, वीज अधिकारी सुलतानी पद्धतीने वीज कट केली जात आहे. पाणी, शेती पंप, लाईट कापली जात आहे. आत्महत्या केलेल्या जाधव याच्या कुटूंबाला मदत करा अशी मागणी त्यांनी केली.
वीज कनेक्शन कापणे बंद करा, वीज बिल वसुली थांबवा, याबाबत तात्काळ आदेश द्या, जीआर काढा. अन्यथा आज एक सुरज जाधव गेला आहे. पण, असेच चालू राहिले तर अनेक सुरज जाधव आत्महत्या करतील असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.