मुंबई : कोकणातील राजापूर येथील प्रस्तावित नाणार रिफानरी प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. ग्रामस्थांनी प्रकल्प नको, अशी हाक दिलेय. ग्रामस्थांसोबत आम्ही असून अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेय. तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनीही प्रकल्पाला विरोध केलाय. मात्र, राज्यात नाणार प्रकल्प होणार आहे. त्यासाठी मी आग्रही आहे, असे सांगत मी नाणारवासीयांना विश्वासात घेवून त्यांचा गैरसमज दूर करण्यात येईल. तसेच उद्धव ठाकरे आणि राणे यांची समजूत काढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.


नाणार प्रकल्पाचा करार नाही!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने केलेला करार हा नाणार प्रकल्पाबाबत नाही. सौदी अरेबियाच्या कंपनीशी झालेल्या सामंजस्य करार हा नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात नव्हे तर वेस्टकोस्ट रिफायनरीजबाबत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यामुळे सामंजस्य कराराबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर आता ग्रामस्थ आणि शिवसेनेची काय भूमिका असेल, याकडे लक्ष लागलेय. तसेच राणे यावर काय प्रतिक्रिया देतात याचीही उत्सुकता आहे.


मुख्यमंत्री पाहा काय म्हणालेत :


- केंद्रात वेस्टकोस्ट रिफानरीचा MOU झालेला आहे. यामध्ये नानार रिफानरी उल्लेख नाही.
- नाणारवासियांना विश्वासात घेऊनच आणि गैरसमज दूर करूनच प्रकल्पाचा निर्णय घेतला जाईल 
- केंद्राची आणि महाराष्ट्र सारकारची इच्छा आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला पाहिजे.
- चेंबूरमध्ये रिफानरी प्रकल्प ५० वर्षांपासून सुरू आहे.तेथे कुठलेही प्रदूषण होत नाही.
- नाणार प्रकल्प हा नागरिकांशी चर्चा करूनच उभारला जाईल.


ग्रामस्थांची भूमिका आक्रमक


भाजप सरकारने नाणार प्रकल्प पुढं रेटण्याची भूमिका घेतल्याने नाणारवासीय कमालीचे संतप्त झालेत. तोडफोड आणि जाळपोळ केल्याशिवाय न्याय मिळणार नसेल तर यापुढं ते देखील करायची आमची तयारी आहे, असा ठाम निर्धार नाणारवासियांच्या गुरूवारी मुंबईत झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नाणारवासियांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केलाय, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होते. मग शिवसेनेनं सत्तेला लाथ मारावी, असं आवाहन संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी यावेळी केले.