`राहुल गांधींना यश मिळवू द्यायचेच नाही, असा विडाच काही लोकांनी उचललाय`
काँग्रेस पुढाऱ्यांचे आपापसातील संभाषण कोणी चोरून ऐकले व ते राहुल गांधींपर्यंत पोहोचवले तरी बरेच गौप्यस्फोट होतील
मुंबई: राहुल गांधी यांना यश मिळू नये यासाठीच त्यांच्याच पक्षातील काही मंडळींकडून जुने वाद वेळोवळी उकरुन काढले जातात. जणुकाही राहुल गांधी यांना यश मिळवू द्यायचेच नाही, असा विडा या लोकांनी उचलला असल्याची टिप्पणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये फोन टॅपिंग प्रकरणावरुन सुरु असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाष्य करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, फोन टॅपिंग हा गुन्हा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यावर आघात आहेच. परंतु लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेलेल सरकार पैशांच्या बळावर पाडणे हा घटनाद्रोह आहे. त्यामुळे कोणता गुन्हा मोठा हे ठरवायला हवे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.
Rajasthan Political Crisis : पायलट- गेहलोत सत्तासंघर्ष रंजक वळणावर; आज फैसला
तसेच शिवसेनेने भाजपला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या काळात झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाचीही आठवण करुन दिली आहे. या काळात विरोधकांचे फोन टॅप करण्यात आले होते. त्यावर बोलले की, अनेकांना मिरच्या झोंबतात, पण या मिरच्यांना बाजारात आज भाव उरलेला नाही. अशा मिरच्यांत तिखटपणा कमी, तडतडणे जास्त. तसे तडतडणे सध्या भाजपकडून सुरु असल्याचा टोला सेनेने लगावला आहे.
राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी काँग्रेसमधील अंतर्गत कलह जबाबदार आहेत. राहुल गांधी यांना यश मिळवू द्यायचे नाही, यासाठी जणू हे वाद काही ठराविक मंडळींकडून उकरून काढले जातात. मध्य प्रदेश त्यातूनच गेले. राजस्थान तूर्त बचावले. काँग्रेस पुढाऱ्यांचे आपापसातील संभाषण कोणी चोरून ऐकले व ते राहुल गांधींपर्यंत पोहोचवले तरी बरेच गौप्यस्फोट होतील. राहुल गांधी यांना धड काम करुच द्यायचे नाही, असा विडाच या मंडळींनी उचलला आहे. याचा फटका समस्त विरोधी पक्षाला बसत असल्याचे मत शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आले आहे.