सतत झोपमोड करणाऱ्या आईला पोटच्या मुलानंच संपवलं; कुठे घडली ही घटना?
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलानेच त्याच्या आईची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलानेच त्याच्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ग्रँटरोड परिसरात हा हत्येचा थरार घडला आहे. आरोपी सुभाष वाघ याला डी.बी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. क्षुल्लक कारणामुळं मुलाने आईची हत्या केली आहे. हत्येचं कारण ऐकून पोलिसही हादरले आहेत.
रमाबाई नथू पिसाळ असे मृत महिलेचे नाव आहे. माय-लेक दोघही एकत्र राहत होते. तर, आरोपी सुभाष वाघ यांचा भाऊ आणि पुतण्या बाजूच्या घरात राहत होते. वाघ यांचे मुळ गाव सातारा होते. तर, आरोपी सुभाष वाघ हा एक दुकान चालवत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याने ते दुकान भाडेतत्वावर दिलं होतं. तसंच, तो घरी काहीही काम न करता राहत होता.
आरोपी वाघ याला रोज सकाळी लवकर उठायची सवय होती. घरातील पाणी भरण्यासाठी तो सकाळी लवकर उठायचा तसंच, रात्रीही लवकर झोपायचा. मात्र, त्याची आई रात्री उशीरापर्यंत घरातील काम करत बसायची. त्यामुळं त्याची झोपमोड व्हायची. यावरुन त्यांच्यात अनेकदा वाद झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मंगळवारीदेखील त्यांच्यात वाद झाला. वाघ झोपलेले असताना त्याची आई काम करत होती. त्यामुळं त्याच्या झोपेत अडथळा निर्माण झाल्यामुळं तो वैतागला. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाले. त्यानंतर रागाच्या भरात वाघ यांनी बाजूला पडलेला भाजी कापण्याचा चाकू उचलला आणि त्याच्या आईवर वार केले. आरोपीने त्यांच्या गळ्यावर, छातीवर वारंवार वार केले.
काही वेळानंतर त्याच इमारतीत राहणारा वाघ यांचा पुतण्या घरी आला तेव्हा त्यांनी रमाबाई यांना या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जखमी महिलेला जेजे रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून वाघ याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून घरातून गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणामुळं एकच खळबळ उडाली आहे.