मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे तथा छोटा राजन याच्यासह सहा जणांना खून प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने हा निकाल दिला आहे. कुप्रसिद्ध गँगस्टर छोटा राजन याला आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलीये. बी. आर. शेट्टी खंडणी आणि गोळीबार प्रकरणी त्याच्यासह ६ जणांना शिक्षा दिली गेली आहे. मुंबईतल्या विशेष मोक्का न्यायालयाने आज या प्रकरणी निर्णय दिला. २०१५मध्ये प्रत्यार्पण झाल्यानंतर राजनला झालेली ही दुसरी शिक्षा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१२ मध्ये हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी छोटा राजनला दोषी ठरवले गेले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने १३३२ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हेगारी षडयंत्र रचणे, हत्या, हत्येचा प्रयत्न आणि शेट्टी यांच्या खुनाचा प्रयत्न असा आरोप ठेवण्यात आला होता. त्यासाठी छोटा राजनविरोधात खटल्यांसाठी विशेष न्यायालया स्थापन केले होते. या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.


शेट्टी यांच्यावर दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी चार गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले होते. तर शेट्टी यांच्या खांद्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. जखमी झालेले असताना त्यांनी पोलीस ठाणे गाठले होते. त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.



खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जानेवारी २०१३ मध्ये मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. ज्यात छोटा राजनच्या सूचनेवरूनच शेट्टींना गोळी मारण्यात आल्याचे म्हटले होते. छोटा राजन यास २०१५ मध्ये बाली येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला भारतात आणले गेले आहे. तेव्हापासून तो दिल्लीतील तिहार तुरूंगात आहे. दरम्यान, गतवर्षीच मुंबईतील पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.