मुंबई : मुंबईतल्या कमला मिल कंपाऊंड परिसरात लागलेल्या आगीत चौदा जणांचे बळी गेल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागं झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमला मिल कंपाऊंड परिसरातील मोजो, वन अबव्ह पबला लागलेल्या आगीला अवैध बांधकाम, अवैध परवानग्या कारणीभूत असल्याचे समोर आलंय. याच पार्श्वभूमीवर पालिकेने आता विशेष अग्निशमन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. या अधिकाऱ्यावर पब, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स पाहणी, परवानगी, एनओसी देण्यासारख्या सगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. दर पंधरवड्याला या संदर्भात पाहणी करण्याची जबाबदारी संबधित व्यक्तीवर असेल. या ठिकाणी आगीसारखी घटना घडल्यास त्या विशेष अग्निशमन अधिकाऱ्यालाच जबाबदार धरण्यात येईल. मात्र हा निर्णय घेण्यासाठी पालिकेला १४ बळी जाण्याची वाट का पाहावी लागली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.


'रुफ टॉप' पब्स पोलिकेच्या रडारवर


लोअर परळच्या कमला मिलमध्ये कम्पाऊंड मोजो आणि वनअबव्ह या रेस्टो पब्सना लागेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत रुफ टॉप पब्स आणि रेस्टॉरन्ट आता पालिकेच्या रडारवर आलीत. महापालिकेनं या अनधिकृत बांधकामावर कारवाईचा हातोडा चालवण्यास सुरुवात केलीय. जुहू इथल्या रॅमी गेस्टलाईन या अनधिकृत रुफटॉप पबवर महापालिकेचा हातोडा पडलाय. 


मोजो बिस्ट्रो - तिघे जण फरार


कमला मिल कंपाऊंड अग्नितांडव प्रकरणी तीन फरार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी लूकआऊट नोटीस बजावलीय. या आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथके तयार केलीय. कमला मिलमधील मोजोस बिस्त्रो, वन अबव्ह या हॉटेल्सना शुक्रवारी आग लागली होती. यांत 14 जणांचा मृत्यू झालाय. हृतेश संघवी, जिगर संघवी, अभिजित मानका या तीन आरोपींना याप्रकरणी लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. मात्र हे आरोपी परदेशात पळून जाऊ नयेत यासाठी पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केलीय. यासाठी देशातल्या सर्व विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आलाय.


न्यायालयीन चौकशीची मागणी


शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी कमला मिलमधील दुर्घटना झालेल्या रेस्टॉरंटची पाहणी केली. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशीची त्यांनी पुन्हा एकदा मागणी केली. याचबरोबर यामध्ये पालिकेच्या अधिका-यांचाही दोष असल्याचं त्यांनी मान्य केलं.