एसटी प्रशासनाकडून संपातील कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम
ST Bus Strike News : एसटी कर्मचारी ( ST employee) संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. आता कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
मुंबई : ST Bus Strike News : एसटी कर्मचारी ( ST employee) संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशी असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी एसटी महामंडळाने संपकऱ्यांवर कारवाई करत हजारो कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून काही मागण्या मान्यही करण्यात आल्या. मात्र, संपकरी कर्मचारी आपल्या विलिनीकरणच्या मागणीवर ठाम आहेत. आता एसटी प्रशासनाकडून संपातील कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
कर्मचारी संपावर ठाम, एसटी विलिनीकरणावर तोडगा कसा निघणार?
आज आणि उद्या दोन दिवसांत कामावर रुजू न झाल्यास परवापासून निलंबित कर्मचाऱ्यांवर कायमस्वरुपी बडतर्फीची कारवाई होणार आहे, अशा इशारा देण्यात आला आहे. जे कर्मचारी निलंबित झालेत ते कामावर रुजू झाल्यास निलंबन मागे घेणार. मात्र, परवापर्यंत कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागी भरती प्रक्रीयेतील वेटींग लिस्टवरील कर्मचाऱ्यांची भरती करणार येणार आहे, असेही एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संपावर आहेत मात्र अद्याप निलंबन झालेले नाही, अशा कर्मचाऱ्यांवरही परवापासून निलंबनाचा बडगा उगारण्यात येणार आहे, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.