कोरोना निगेटिव्ह असणाऱ्या प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी `या` दिवसापासून एसटी बसेस उपलब्ध
मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकांवर बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरु झाली आहे. यंदाचं वातावरण दरवर्षीप्रमाणे नाही. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी प्रवाशांना नियमांचं पालन करणं आणि योग्य ती खबरदारी पाळणं अनिवार्य आहे. १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मात्र प्रवासापूर्वी कोककणात जाणाऱ्या प्रवाशांनी कोरोना चाचणी (RT- PCR Swab Test ) करणं अनिवार्य आहे. चाचणी निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकांवर बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
आरक्षण केल्यानंतर, प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही. त्याशिवाय प्रवासासाठी स्वतंत्ररित्या ई-पासची आवश्यकता नसल्याची, माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
एसटीने मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकांवरुन बसेस सुरु केल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून आज तब्बल 10 हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केलं आहे. योग्यरित्या सॅनिटाईझ केलेल्या बसेस महामंडळाने प्रवासासाठी उपलब्ध केल्या असल्याची माहितीही देण्यात आली आहे. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रवाशांना प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आणि मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
प्रवासादरम्यान केवळ महामंडळाच्या अधिकृत ठिकाणीच पिण्याचं पाणी आणि नैसर्गिविधीसाठी वाहनं थांबविण्याची दक्षता महामंडळाकडून घेण्यात आली आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी त्यांच्या भोजनाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतः करावी अशी विनंती करण्यात येत आहे.