लालपरीची कमाल; तीन दिवसांत २१७१४ मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडले
काही ठिकाणी तर आवश्यकतेनुसार श्रमिकांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्थाही एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे.
मुंबई: खिशात दमडी नसल्याने पायीच आपल्या गावांकडे चालत निघालेल्या गरीब मजुरांसाठी आता एसटी देवदूत ठरताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागांतील तब्बल ११६९ एसटी बसेसने २१,७१४ मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सोडले आहे.
...म्हणून आंतरजिल्हा एसटी वाहतुकीचा निर्णय बदलला- अनिल परब
आज एका दिवसात ठाणे,नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर अशा विविध विभागातील ५३० एसटी बसेस द्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करत चाललेल्या ११ हजार ८६६ मजुरांना गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व कर्नाटकातील सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले. ऐनवेळी एसटी मदतीला धावून आल्याने या मजुरांची पुढची पायपीट वाचली.
भर उन्हात पायपीट करीत चाललेल्या या हजारो मजुरांना एसटी बसेस मध्ये बसवून सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करीत राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात एसटी कर्मचारी मोलाची कामगिरी बजावत आहेत. काही ठिकाणी तर आवश्यकतेनुसार श्रमिकांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्थाही एसटी महामंडळाकडून करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
महाराष्ट्रातील यूपीच्या मजुरांच्या सुरक्षित प्रवासासाठी हेमामालिनी राज्यपालांच्या भेटीला
आगामी काळातही लॉकडाऊन संपेपर्यंत अशाचप्रकारे कष्टकरी कामगार-मजुरांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचे व तेथे अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील श्रमिकांना सुखरूप घरी घेऊन येण्याची मोहीम एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. तरी त्यांनी धोकादायक पद्धतीने पायपीट न करता , एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले आहे.