मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद असल्याने गेल्या महिनाभराहून अधिक काळ प्रवासी मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत. हाताला काम नसल्याने मजूरांना राहण्यासह, खाण्या-पिण्याचीही मोठी समस्या होत आहे. त्यामुळे हातात पैसे नसल्याने मिळेल त्या मार्गाने मजूरांनी आपल्या गावी जाण्याचा मार्ग निवडला आहे. मजूरांना त्यांच्या गावी सुरक्षितपणे पोहचण्यासाठी खासदार हेमा मालिनी यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.
मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि विशेषतः मथुरा येथे परत जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल चर्चा केली.
17 मे रोजी देशातील तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 3.0 संपण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र भारतातील कोरोनाची स्थिती पाहता लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्व रेल्वे सेवा, विमान सेवा बंद करण्यात आल्या. कारखाने, फॅक्टरीही बंद झाल्या. दैनंदिन रोजगारावर काम करणाऱ्या मजूरांच्या हातातलं काम गेल्याने त्यांनी घरी जाण्याचा मार्ग निवडला. गेल्या कित्येक दिवसांपासून रेल्वे सेवा बंद होती. मात्र आता मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी रेल्वेकडून ट्रेनची सुविधा करण्यात येत आहे.