मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी चांगली जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज दिवाळी भेटची घोषणा केली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही दिवाळी भेट तातडीने देण्यात यावी, अशा सूचना संबंधीतांना देण्यात आल्यात. एसटी अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या १० टक्के इतकी अंतरीम वाढ करण्याचा निर्णयही रावते यांनी आज जाहीर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रावते यांनी आज कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५,००० रुपये दिवाळी भेट देण्याचे जाहीर केलेय. याशिवाय एसटी अधिकाऱ्यांना १० टक्के इतकी अंतरीम वेतन वाढ देण्याचा तसेच एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही आज जाहीर करण्यात आला. ही वेतनवाढ ऑक्टोबर २०१८ पासून लागू होईल. 


राज्य शासनाप्रमाणे एसटी अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के इतकी वाढ जुन्या वेतनानुसार करण्यात आलेय. ऑक्टोबर २०१८ च्या वेतनापासून हा महागाई भत्ता देण्यात येईल. वेतनवाढीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आधीच सुधारित झालेय. तसेच महागाई भत्त्यामध्ये केंद्र शासनाप्रमाणे २ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पगारवाढीतील मागील थकबाकीतील ५ हप्त्यांची रक्कमही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येत्या १ नोव्हेंबर रोजी देण्याचे आदेश रावते यांनी दिलेत.