दीपक भातुसे, मुंबई : ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा चौथाा दिवस असून या चार दिवसात एसटीचे तब्बल १२० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्यभरात गाव-खेड्यात जाणाऱ्या एसटीतून दिवसाला तब्बल ६७ लाख प्रवासी प्रवास करतात. यातून एसटीला दिवसाला २२ कोटी रुपये उत्पन्न मिळते, मात्र दिवाळीच्या सणात प्रवाशांच्या आकडा वाढत असल्याने एसटीचे उत्पन्नही दिवसाला ३० कोटी रुपयांपर्यंत जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात एसटीचे २५० थांबे असून अहोरात्र एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असते. मात्र संपात मागील चार दिवस एसटीची चाकं थंड पडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एसटीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने एसटी आधीच तोट्यात आहे.


वर्षाला एसटीला ७१०० कोटी रुपये उत्पन्न मिळते, तर एसटीचा वर्षाचा खर्च  ७५८३ कोटी रुपये इतका आहे. यात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारावर ३१०० कोटी रुपये तर डिझेलवर २९०० कोटी रुपये खर्च होतात. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना जादा पगारवाढ देता येणार नाही अशी भूमिका एसटी महामंडळाने घेतली आहे. तर कर्मचारी पगारवाढीच्या मागणीवर ठाम आहेत. 


एसटीची तारेवरची कसरत, उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त


- एसटीचे दिवसाचे उत्पन्न २२ कोटी


- दिवाळीतील उत्पन्न ३० कोटी


- एसटीचे वार्षिक उत्पन्न - ७१०० कोटी


- एसटीचा वार्षिक खर्च - ७५८३ कोटी


- पगारावरील खर्च - ३१०० कोटी


- डिझेल खर्च - २९००


- कर्मचारी-अधिकारी संख्या - १ लाख ५ हजार


- एसटी डेपोंची संख्या - २५०